Short News

सुधीर मुनगंटीवार जाणार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

सुधीर मुनगंटीवार जाणार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेतील युतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. अद्याप भेट निश्चित झाली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी ‘मातोश्री'वर या दोघांचीही भेट होईल.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे. 
पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानात लग्नाला नकार दिल्याने मुलीची हत्या

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. 26 वर्षीय एका इटालियन-पाकिस्तानी मुलीची तिच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीचा खून करण्य़ात आला. सना चीमा असे या खून झालेल्या मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे पूर्ण परिवाराने अपघात झाल्याची बतावणी केली होती.
राजापोरा येथे पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

राजापोरा येथे पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) माजी नेते गुलाम नबी पटेल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. पुलवामा येथील राजापोरा येथे दहशतवाद्यांनी गुलाम नबी पटेल यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते. गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान गुलम नबी पटेल यांना रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला.